आनंदगंध




पक्ष्यांचा  किलबिलाट  अलगद कानावर येत राहिला की साखर झोप अलवार  जागवते। किलकिल्या डोळ्यावाटे  खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाच्या आभा,त्यासोबत आभाळभर पसरलेला शेंदरी रंगाचा  सडा लख्ख जागे करतो। विविध ऋतुतील सुर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी लाल ,शेंदरी ,भगवा ,पिवळा तर कधी कधी राखाड़ीसुद्धा. आपल्या अंतरातील रंगांची उधळण मुक्तपणे आभाळात पसरवितात अन आपल्याला कस प्रसन्न करून टाकतात।त्यात भर घालतात, पावसाळ्यात उमटणारे  इंद्रधनुष्य। कधी कमाणी स्वरुपात तर कधी एकमेकांमधे गोफविणुन  आकाशात मांडव टाकल्यासारखे ,सगळेच कसा मोहवून टाकणारे ,शिशिरात बदलत जाणारे झाड़ा-पानांचे बदलते रंग , त्यांची पानगळ,चैत्रात फुटणारी नवीकंच कोवळी पालवी, त्यांचा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा ,ग्रीष्मात फुलणारा लालभडक गुलमोहर अन झाडावर हळुवार झूलणारा पिवळा धमक बहावा 

हर एक पौर्णिमेची  रात्र काही औरच। अंधाराच्या पदरावर ,ठसठशीत उमटलेली चांदण्यांची नक्षिच जणू। शरदाच्या  दुधाळ चंद्राचा दिमाख तर विचारायलाच नको.वाहत्या पाण्यात प्रतिबिंबीत झालेले शरदाचे  चांदणे।वाह !! क्या बात हैं !!
दिवसा निळ्याशार  पाण्याला कवेत घेऊन वाहणारे सरिता-सागर रात्री ह्या चांदण्यांवर तरंगत आहेत असे वाटते।।निसर्गाच्या कुशीतील या आणि अशा काहीतरी जागत्या स्वप्नांचा आस्वाद आपण डोळ्याने घेत असतो। त्यातून आयुष्यभरासाठी मिळवलेला आनंद साठवून ठेवण्यास आपली  झोळी सुद्धा अपुरी पडते। कधी आपण थोडवेळासाठी स्वताशी डोळे बंद करून विचार करुयात।हा आनंद मी घेऊच शकले नाही तर ? दचकलात ना ?घाबरु नका कारण हा फक्त विचार आहे वास्तव नाही परंतु ज्यांच्या आयुष्यात हेच एकमेव वास्तव आहे त्यांचे काय ?


अगदी लहानपणापासून माझी सवय की वाढदिवसाचा महीना आला की अगदी पहिल्या तारखेच्या दिवशी,माझा वाढदिवस रंगीत पेनाने खुण करून ठेवायचे।वाढदिवस कसा साजरा करायचा याची वेगवेगळी योजना अखायचे।प्रत्येक नवी कल्पना सुचली की आधिचा आपोआप रद्द व्हायची।त्यात ही  भारी मौज असायची।मित्रमैत्रीणीचा आमंत्रण याद्या ,खाऊ काय करायचा आणि बरेच काही।हळू हळू मोठे होत गेले तसे समजायला लागले की माझ्या वाढदिवसा दिवशी जागतिक अंध दिन असतो. निसर्गाच्या जादूचा पेटारा मी समोर उघडून त्याकडे त्रयस्थपणे बघत असतानाच हे सगळे ज्यांच्यासाठी वंचित आहेत त्यांची जाणीव सलत राहते। मग मनात येऊन जाते की अपला जन्म एका विषिष्ठ कारणासाठी झाला आहे ,ते कार्य ओळखून त्या दिशेने छोट्याश्या पावलांनी का होईना पण मार्गक्रमण करायचे।

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अ. प. ज अब्दुल कलाम यांसारख्या द्रष्टया माणसाचा जन्मदिवस सुद्धा याच दिवशी असावा याचा मला सार्थ अभिमान वाटतो।त्यांनी २०२० ची एक स्वप्नभरी दृष्टी आपल्या भारताला दिली।त्यांनी युवकांना स्वप्ने अशी पहा की जी तुम्हाला झोपू देणार नाहीत असे अव्हाहन केले।पहिल्या यशानंतर स्वस्थ बसु नका ,जर दुसऱ्यांदा अपयश आले तर पहिले यश केवळ योगयोग असे लोक म्हणतील, ही शिकवण त्यांनीच दिली।डॉ कलामांचे आयुष्य आपल्या सर्वांसाठी एक विद्यापीठ आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही।जेव्हा मी अमेरिकेत आले तेव्हा ऑक्टोबर १५ हा दिवस यूनाइटेड नेशन्स ग्रामीण शेती क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी साजरा करतो हे समजले।

एकाच दिवसाचे असे वेगवेगळे महत्व मला समजल्यावर अपला जन्मदिवसच नव्हे तर जेव्हा केव्हाही आपल्याला समाज,देश, मानवता या साथी हाथभार लावता आला तरी आयुष्यात प्रत्येक दिवसच नवनवीन अनुभवाने जन्मदिवसच ठरेल। म्हणून या जन्मदिवसासाठी मी स्वतःला आनंदाची एक भेट दिली आहे आणि ती म्हणजे जेवढे शक्य आहे तेवढे इतरांना आनंद देण्याचा कारण असे जाणवते की आनंद हा असा सुगंध आहे जो इतरांवर शिंपत असताना स्वतःवरही शिंपला जातो।


ऋतुजा जगताप

Comments

Popular posts from this blog

Wish you were here!

To, My Brightest Star

मागे वळून पाहताना